सहाय्य:वर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्ग हे विकिपीडियाचा आधार असलेल्या मीडियाविकी सॉफ्टवेअरांतर्गत उपलब्ध असलेले, निरनिराळ्या पानांना एखाद्या समुच्चयात आपोआप गोळा करू शकणारे एक सॉफ्टवेअर-वैशिष्ट्य आहे. विकिपीडियासारख्या प्रकल्पातील एखाद्या विषयाशी संबंधित पानांचे गटवार पद्धतीने शिस्तबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी वर्गांचा उपयोग केला जातो.

विकिपीडियावरील एखाद्या वर्गपानावर त्या विवक्षित वर्गात समाविष्ट केलेले लेख (व अन्य नामविश्वांतील पाने) वर्णानुक्रमे सूचीबद्धरीत्या मांडलेली आढळतात. तसेच वर्गपानावर उपवर्ग अशा नावाचाही विभाग असू शकतो. उपवर्ग म्हणजे त्या विवक्षित वर्गात समाविष्ट केलेले इतर वर्गच असतात. वर्ग आणि उपवर्गांच्या या शाखा-निहाय मांडणीमुळे लेखांचे नेमके व्यवस्थापन करणे व त्यांतून मार्गक्रमण करणे सोयीचे होते.

लेखांचे वर्गीकरण कसे करावे

एखाद्या लेखाच्या विकिमजकुरात एखाद्या वर्गाचा विकिलेखनानुसार जाहीर-उल्लेख, अर्थात डिक्लरेशन, केल्यास त्या विवक्षित वर्गात लेखाचे वर्गीकरण होते. [[वर्ग:वर्गाचे नाव]] अथवा [[वर्ग:वर्गाचे नाव|सॉर्ट की]] अश्या पद्धतीने विकिलेखन करून लेखामध्ये वर्गाचा जाहीर-उल्लेख करून लेख 'वर्ग:वर्गाचे नाव' नामक वर्गात समाविष्ट होतो.

वर्गीकरणाचे संकेत

  1. वर्गीकरणात बहुधा अनेक लेखांचा समावेश होत असल्यामुळे वर्गांची नावे समुच्चयदर्शक स्वरूपाची - आणि म्हणूनच अनेकवचनी - असतात. उदा., ताऱ्यांवरील लेखांच्या वर्गीकरणासाठी [[वर्ग:तारा]] अशा नावाचा वर्ग बनवू नये; त्याऐवजी [[वर्ग:तारे]] असे अनेकवचनी रूप वापरून समुच्चय दर्शवणाऱ्या नावाचा वर्ग बनवावा.
  2. लेखाच्या मुख्य विषयाला अनुसरून चपखल वर्गीकरण करावे. उदा० : विष्णु वामन शिरवाडकर या लेखाचे वर्गीकरण नुसतेच [[वर्ग:व्यक्ती]] असे न करता [[वर्ग:मराठी कवी]] असे करणे माहितीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने नेमके व उपयुक्त ठरते.
  3. लेखासाठी चपखल वर्ग अगोदरच उपलब्ध आहे का, याचा शोध घ्यावा. यासाठी लेखाच्या मुख्य विषयाच्या जातकुळीतले अन्य लेख संदर्भासाठी हुडकून त्यांचे वर्गीकरण कसे केले आहे, ते जाणून घ्यावे. सध्या उपलब्ध असलेल्या वर्ग-उपवर्गांच्या विस्ताराचा अंदाज घेण्यासाठी वर्ग:आशय येथून शाखा-उपशाखांमध्ये विस्तारलेला वर्गवृक्ष चाळावा.
  4. वर्गीकरणाच्या ओळी - म्हणजेच [[वर्ग:मराठी कवी]] इत्यादी सिंटॅक्स असलेल्या ओळी - लेखातील वाचनीय मजकुरानंतर आणि आंतरविकी दुव्यांच्या वर नोंदवाव्यात. लेखाचे वर्गीकरण अनेक वर्गांत होत असेल, तर प्रत्येक ओळीवर एकेक वर्ग नोंदवावा व वर्णानुक्रमे त्यांचा क्रम राखावा.